रोज होतीस भेटत
पण तेंव्हा वेगळी वाटलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
सुर्यास्त पहाण्याचा
तुला होता छंद
माझ्या निर्मळ प्रेमाचा
नव्हता तुला गंध
त्या संध्याकाळी तू
खुप वेळ थांबलीस
बोलता बोलता अचानक
थोडी तू अडखळलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
मावळत्या प्रकाशात
चेहऱ्यावर तुझ्या लाली
अंधुकश्या उजेडात
लाज पसरलेली गाली
नेहमी बडबडणारी
तू शांत तेंव्हा होतीस
चोरट्या तिरक्या नजरेने
पहात तू हसलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
सुर्य गेला क्षितिजाआड
कि पाठ तुझी फिरायची
पण त्या दिवशी नव्हती
घाई तुला जाण्याची
क्षितिजाचे ते रंग
न्याहाळत तू राहिलीस
गुढ वेगळ्या विचारात
होती तू हरवलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
बावरलेली तुझी नजर
नव्हती माझ्याकडे वळली
मनातली तुझ्या चलबिचल
होती ग मला कळली
माझ्या शेजारी येवुन
आपसुकच तू बसलीस
नेहमीचा तो स्पर्श
पण तू थोडी शहारलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
Advertisements
REPORT THIS AD
तू हलकेच टेकवलेस
डोकं माझ्या खांद्यावर
तरंगत असलेलं तुझं मन
होतं विसावलं माझ्यावर
बंधनं सारी झुगारून
मला तू बिलगलीस
पापण्या मिटुन डोळ्यांच्या
प्रेमाची तू कबुली दिलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
0 Comments